दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन; राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी

देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्या पावसावर राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा मोठा खंड पडला. पावसाच्या ब्रेकमुळे खरीप हंगाम धोक्यात आला. सप्टेंबर महिन्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. आता कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.राज्यातील नंदुरबार, वाशिम, परभणी, अमरावती, भंडारा या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आज विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातही आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुण्यासह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.गेल्या महिन्याभरात पावसाने राज्यात दडी मारली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच राज्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सुकलेल्या पिंकाना नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक भागात उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली, मालाडसह अनेक भागात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ७ आणि ८ तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही बुधवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. सकाळपासून प्रखर ऊन्ह असताना दुपारी अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. पावसामुळे खरीपातील पिकांना जीवदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.