मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली; पाप फेडण्यासाठी उपोषण करावे – सदाभाऊ खोत

मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे गेल्या बारा दिवसापासून जालना जिल्ह्यात उपोषण करत आहे. याच पार्श्वभूमीवर रयत क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यात आणि शरद पवार गटात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शरद पवार लढाऊ नव्हेतर पाठीत खंजीर खुपसणारे सेनापती. त्यांनीच मराठा समाजाची माती केल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात बोलताना केली आहे. शरद पवारांनी आता थांबावे, आम्ही मराठे त्याची वाट बघत असल्याचेही खोत यांनी म्हटले आहे.सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण सर्वदूर तापले असताना, याच मुद्द्यावरून सदाभाऊंनी खासदार शरद पवारयांच्यावर टीका केल्याने पवार समर्थक नेते आणि सदाभाऊंमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे शरद पवार आज एका ब्राह्मण नेतृत्वावर मराठा आरक्षणाचे खापर फोडत आहेत, अशी टीकाही सदाभाऊंनी केली.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनी जाणीवपूर्वक मराठा समाजाचं आरक्षण घालवलं आहे. मराठा समाजाची शरद पवारांनी माती केली आहे. हे पाप फेडण्यासाठी शरद पवारांना आझाद मैदानात उपोषण करावं लागणार आहे. दरम्यान, आज माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी देखील या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “मराठा समाजाला आता शब्द आणि दिशाभूल नको आहे. मराठ्यांना आता ठोस आरक्षण पाहिजे आहे.