आजपासून मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक होत आहे. औरंगाबाद येथे तब्बल सात वर्षानंतर ही बैठक होत आहे. या बैठकीत एकूण 75 निर्णय होणार आहेत. मराठवाड्यासाठी पॅकेजही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीसाठी अख्खं मंत्रिमंडळ शहरात दाखल झालं आहे. या पार्श्वभूमीवर कॅबिनेटच्या बैठकीआधीच राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केला. राज्य सरकारने राज्यातील दोन जिल्ह्यांची नावे बदलली आहेत. मराठवाड्यातील जनतेसाठी ही मोठी भेट असल्याचं सांगितलं जात आहे.
राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभागाचे आणि गावाचे नाव आता धाराशिव असणार असल्याचं म्हटलं आहे.तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे, तालुक्याचे, उप विभाग आणि गावाचे नाव आता छत्रपती संभाजीनगर असणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला मोठं गिफ्ट मिळालं आहे. या आधीही औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलं होतं. पण त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यानंतर आता सरकारने राजपत्र प्रसिद्ध करून थेट अधिसूचनाच जारी केली आहे.
यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्यात आले होते. पंरतु औरंगाबाद विभाग, जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गाव तसंच उस्मानाबाद जिल्हा, उप-विभाग, तालुका आणि गावाचे नाव बदललेले नव्हते. त्यामुळे शहरानंतर इतर नावे शुक्रवारी राज्य सरकारने राजपत्र जारी करुन बदलली.राज्य सरकारचे उपसचिव संतोष गावडे यांच्या सहीने राज्य सरकारने अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध करुन अधिसूचना जारी केली आहे.


