ऑलिंपिक समितीचे अधिवेशन भारतासाठी ऑलिंपिक संयोजनाची संधी घेऊन येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धां सर्वसमावेशक असते. ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. अशा या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे मुंबईत होणारे अधिवेशन भारतासाठी ऑलिंम्पिक संयोजनाची संधी घेऊन येईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे १४१ वे अधिवेशन १५ ते १७ ऑक्टोबरदरम्यान होणार आहे. भारताला ४० वर्षांनंतर दुसऱ्यांदा या अधिवेशनाचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. या अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे कार्यकारी मंडळ मुंबईत दाखल झाले. या कार्यकारी मंडळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे स्वागत केले.या दोघांनीही हे अधिवेशन संस्मरणीय आणि ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच यातून ऑलिंपिकशी निगडीत विविध स्पर्धांच्या संयोजनाची संधी भारताला मिळेल ,अशी आशाही व्यक्त केली.आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या नेतृत्वाखालील या कार्यकारी समितीच्या शिष्टमंडळात सदस्य तथा रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी, मार्क ॲडम्स, ख्रिस्टेन क्लाई, मरीना बारामिया, मोनिका श्रेर, टिना शर्मा यांचा समावेश होता.

या कार्यकारी मंडळाचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ऑलिंपिक समितीचे हे अधिवेशन महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईसाठी मोठी महत्त्वाची संधी आहे. यातून मुंबईची आंतरराष्ट्रीय शहराचा लौकिक आणखी बळकट होईल. समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक आणि अधिवेशनासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. विशेष म्हणजे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच समितीच्या सदस्य म्हणून आणि तेही एका महिलेला नीता अंबानी यांच्या रुपाने स्थान मिळाले आहे, हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. भारतातील दुर्गम आणि वंचित अशा घटकांतील मुलांसाठीच्या शिक्षण आणि क्रीडा कौशल्य पोहोचवण्याची त्यांची बांधिलकी कौतुकास्पद आहे.

ऑलिंपिक व्ह्यॅल्यू एज्युकेशन प्रोग्रॅमच्या माध्यमातून भारतातील २ कोटीहून अधिक मुलांपर्यंत क्रीडा कौशल्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न महत्त्वपूर्ण आहे. खेळ हा देशाचा विकास आणि बांधणीतील महत्त्वाचा घटक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया च्या माध्यमातून देशातील खेळाडूंना संधी उपलब्ध करू दिली. गेल्या नऊ वर्षांत क्रीडा क्षेत्रासाठीच्या आर्थिक तरतुदीत तिपटीने वाढ करण्यात आली आली आहे. यामुळेच आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देशांत खेळांसाठीच्या सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अशा पायाभूत सुविधा उभा राहिल्या आहेत. भारतीय युवकांमधील क्षमतांचा विकास करण्यावर त्यांनी भर दिला आहे. केंद्र सरकारने तरुणांना खेळात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. भारताने या आधीही अशा भव्य क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाची क्षमता सिद्ध केल्याचाही पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी केला.

१५ ते १७ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान होणारे हे अधिवेशन महाराष्ट्राच्या क्रीडा लौकिक आणि आदरातिथ्याला साजेसे भव्य दिव्य राहील, अशी तयारी करण्यात येत आहे. अधिवेशनाचे औपचारिक उद्घाटन रविवारी १४ ऑक्टोबर २०२३ रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमधील ग्रँड थिएटर येथे होणार आहे. अधिवेशनाच्या आधी १२ ते १४ ऑक्टोबरदरम्यान आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे.