देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण आपल्या प्राणांची आहुती देऊन शहीद झाले. त्यांच्या स्मृती, पराक्रम येणाऱ्या पिढ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शक ठरावा, यासाठी दिल्ली येथे अमृत वाटीकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या अमृत वाटीकेत देशातील प्रत्येक गावांमधून अमृत कलशांच्या माध्यमातून माती नेण्यात येणार असल्याने या वाटीकेत देशातील प्रत्येक गावाचे प्रतिबिंब दिसणार आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.
कालिदास कलामंदिर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यात ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या अमृत कलश यात्रा कार्यक्रमात दादा भुसे बोलत होते. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दादा भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील एक हजार ९२६ गावांची माती या अमृत कलशांमार्फत दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या अमृत वाटीकेत मिसळली जाणार आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे अभियान गाव पातळीवर अतिशय उत्साहाने साजरे करून तालुकास्तरावरून आणलेले हे अमृत कलश जिल्ह्यामार्फत येत्या काही दिवसांत दिल्लीला जाणार आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी शहीदांच्या स्मृतींना स्मरण करण्यासाठी सुरू असलेली ही अमृत कलश यात्रा जिल्हावासियांच्या सहभागाने यशस्वी झाली आहे. यासोबतच केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजना तसेच आरोग्य विभागाच्या योजनांसाठी देण्यात येणाऱ्या गोल्डन कार्डचा देखील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींसाठी आवश्यक असलेल्या साहित्याबाबत २६ ऑक्टोबर रोजी आयोजित शिबिरात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहनही यावेळी दादा भुसे यांनी केले.
