देशाचं हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करत आहेत. त्यामुळे आमचं भाजप सोबत जाण्याचे अगोदरच ठरले होते. असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. राज्याचे आणि या भागातील हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अजित पवार म्हणालेत.
बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना हे मत व्यक्त केले आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, राज्यातील वातावरण हे वेगळं झालेल आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील हे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत. त्यांच्या या सभेला मोठ्या प्रमाणावर तरुण सहभागी होत आहेत. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे याबद्दल दुमत नाही. पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला 16% आणि मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यायचा आम्ही प्रयत्न केला मात्र ते कोर्टात टिकलं नाही. मग पुन्हा, मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरक्षण देण्याचा प्रयत्न ते आरक्षण हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. आता धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे तर आदिवासी समाज म्हणतोय की आमच्यातील आरक्षण कुणाला देऊ नका. जरांगे पाटील म्हणतायेत आम्ही छाताडावर बसून आरक्षण घेऊ सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले द्या. जरांगे पाटील यांनी दिलेल्या मुदतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक समिती नेमली आहे. ते त्याचा अभ्यास करत आहेत. मराठा समाज आक्रमक झाला आहे. जरंगे पाटलांच्या सभांना प्रचंड अशी गर्दी होत आहे अशी परिस्थिती बघायला मिळते आहे असे अजित पवार म्हणालेत.
