म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 5 हजार 863 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीनुसार आता इच्छुकांना 31 ऑक्टोबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहेत. तर 24 नोव्हेंबरला पुणे मंडळाच्या कार्यालयात सोडत काढण्यात येणार आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या 5 हजार 863 घरांसाठी सप्टेंबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तर 5 सप्टेंबरपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात झाली आहे.
म्हाडाच्या पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 5 हजार 863 सदनिकांच्या सोडतीसाठी 6 सप्टेंबर रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर होती. मात्र, अर्जदारांना अर्जासोबत रहिवासी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र अर्जदारांना हे कागपदापत्र मिळण्यास वेळ लागत असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते.अनामत रक्कम भरण्यासाठी अर्जदारांना 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृती अर्जांची प्रारूप यादी 8 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. 20 नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर होणार आहे. यशस्वी आणि प्रतीक्षा यादीतील अर्जदारांची नावे 24 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातील.
31 ऑक्टोबरपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करत अर्ज सादर करता येणार आहे. अर्जविक्री-प्रक्रिया संपल्यानंतर सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 8 नोव्हेंबरला सायंकाळी 05.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. तर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 20 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
