मराठा आरक्षणप्रश्नी सह्याद्री अतिथीगृहावर आज सर्वपक्षीय बैठक

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चिघळला आहे. राजकीय वातावरण देखील तापलं आहे, अशातच आरक्षणावर तोडगा निघत नसताना दुसरीकडे मात्र, मनोज जरांगे पाटील टप्प्या टप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढवत आहेत. मनोज जरांगे आता आंदोलन आणखी तीव्र करणार आहेत. राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. आज होणाऱ्या या बैठकीत आरक्षणावर तोडगा काढण्यावर चर्चा होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सकाळी साडेदहा वाजता सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा मानस आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्रातील शांतता सुव्यवस्था टिकवण्याकरता सर्वपक्षीयांचा सहयोग आवश्यक असल्याचं सरकारचं मत आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याकरता सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींनी आवाहन करणं गरजेचं असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.

आजच्या बैठकीला 27 नेत्यांना बोलावण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे, भाजपचे प्रदेशााध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राजेश टोपे, शेकापचे जयंत पाटील, बविआचे हितेंद्र ठाकूर, जनता दल (यू)चे कपिल पाटील, जनसुराज्यचे विनय कोरे, रासपचे महादेव जानकर, प्रहारचे बच्चू कडू, मनसेचे राजू पाटील, अमरावतीचे आमदार रवी राणा, माकपचे विनोद निकोले, वंचितचे प्रकाश आंबेडकर, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे, आरपीआय गवई गटाचे राजेंद्र गवई, आरपीआय आठवले गटाचे गौतम सोनावणे आणि बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखाताई कुंभारे यांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आलं आहे.