हल्ला मराठा समाजानं केलेला नाही, समाजकंटकांनी केलेला असावा, योग्य वेळी पुराव्यानिशी बोलणार – संदीप क्षीरसागर

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी (ता. ३०) जिल्ह्यात हिंसक वळण लागले. शासकीय मालमत्तांसह नेत्यांची घरे जाळण्याच्या आणि दगडफेकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. माजलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक व वाहने जाळण्यासह माजलगाव येथील नगरपालिकेला आग लावली.

यानंतर बीड शहरात देखील आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरासह राष्ट्रवादी भवनला पेटवल्याच्या घटना घडल्या.या घटनेनंतर पहिल्यांदाच आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर आरोप केला आहे.याबाबात संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, असंही संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, घरावर हल्ला झाला तेव्हा सर्व कुटुंब घरातच होतं, हल्ला मराठा समाजानं किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसून काही समाजकंटकांनी केला असावा, याबाबत योग्य वेळी पुराव्यानिशी बोलेनं, असं ते म्हणाले आहेत.मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली. अतिशय शांततेत व शिस्तीत सर्व आंदोलन करणारा माझा मराठा बांधव हिंसक आंदोलन करू शकणार नाही. काल जो प्रकार घडला तो मराठा समाजाने किंवा स्थानिक लोकांनी केलेला नसुन काही समाजकंटकांनी केलाअसावा.