मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच मोठा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती निर्माण करण्यात आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेतलं असत तर भानगड राहली नसती. तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हित जोपासले. जेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसींमध्ये मराठ्यांना घेतलं होतं, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी पवारांवर आरोप केला आहे. केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा कोठा वाढवला पाहिजे. मराठा हा ओबीसीमधेच आहे. त्यांना त्याचा फायदा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.
शिष्टमंडळ न येण्यामागे ओबीसी नेत्यांचा दबाव दिसतो का? असं विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, “दबावाचे कारण नाही. थोडीच अमेरिकेतून आणलेल्या लोकांना ओबीसीमधून आरक्षण देतोय. मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही.”
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन 2 नोव्हेंबर रोजी मागे घेण्यात आलं. त्यांनी आरक्षणासाठी सरकारला दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. तसंच उपोषण आपण मागे घेतलं असंही जाहीर केलं आहे. वेळ घ्या पण आरक्षण द्या अशी भूमिका आता मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र, वेळ वाढवून देताना मनोज जरांगे पाटील यांनी काही अटी ठेवल्या आहेत.
