राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत साडी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 24 लाख 58 हजार 747 अंत्योदय कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार असून याबाबत सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
या योजनेची विशेष बाब अशी की, या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या साडीचे वितरण एका विशिष्ट सणाच्या दिवशी केले जाणार आहे. राज्य शासन ज्या सणाच्या दिवशी साडीचे वितरण करण्यास सांगेल त्या सणाला अंत्योदय कुटुंबातील महिलांना साडीचे वाटप केले जाणार आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी ही योजना निश्चित करण्यात आली आहे. तर राज्य यंत्रमाग महामंडळ ही संस्था ही योजना राबवणार आहे. या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, साठवणूक, हमाली यांसाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासन देणार आहे. एक साडी 355 रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेतंर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना रेशनकार्डधारकांना गणपती, दिवाळी अशा सणांमध्ये गतवर्षीपासून आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. यंदाही दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. यंदाच्यावर्षी मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो रवा, चनाडाळ, मैदा आणि पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ 100 रूपयांना देण्यात येत आहे.
