आज परळीत आल्यावर दोन महत्त्वाच्या नाथांचं दर्शन आम्ही घेतलं. परळी वैजनाथांचं दर्शन आम्ही घेतलं. तसंच ज्यांच्या उर्जेमुळे राजकारणात आम्ही आहोत त्या गोपीनाथाचं दर्शन आम्ही घेतलं. परळी वैजनाथाच्या चरणी नतमस्तक होताना मी गोपीनाथ मुंडे यांनाही अभिवादन करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी एक मिरवणूक ठेवली होती. ती मिरवणूक काढली असती तर संध्याकाळपर्यंत कार्यक्रम झाला नसता कारण तुमचं दर्शन आम्हाला झालं नसतं, असं म्हणत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना एक महत्त्वाची विनंतीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी असंच एकत्र राहावं, एका स्टेजवर राहावं. आमच्या तिघांची अशी ताकद तुमच्या मागे उभी करू की परळचीच काय बीडही आपलं असेल. परळी, बीडसोबत महाराष्ट्राचं कल्याण करू. हा मंच असाच राहो.
माननीय मुख्यमंत्री वैज्यनाथ देवस्थानचा विकास आराखडा केंद्राकडून मंजूर करून आणणार आहेत. आम्ही तिघे एकत्रित आल्यानंतर आमच्या तिघांचा एकच ध्यास आहे तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. तुम्हाला शेजारच्या घरात कुणी विचारत नाही, आम्हाला शेजारच्या राज्यात प्रचारासाठी बोलवतात असा टोलाही त्यानी उद्धव ठाकरेंना लगावला.
पंकजा मुंडे यांनी माझी ‘लेक भाग्यश्री योजना’ सुरु केली होती. त्याचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. ज्या घरात मुलगी जन्माला येईल ते घर लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आमच्या माता-भगिनींनी आणखी एका निर्णयाचं स्वागत केलं आहे. 50 टक्के तिकिट दरांमध्ये एसटीचा प्रवास सुरु केला आहे. तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही सांगू शकता तुम्ही घरी बसा मी जाऊन येते कारण मी जाऊन आले तर एसटीला अर्धच तिकिट लागतं. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले
