अमली पदार्थ तस्करीतील मुख्य सूत्रधार ललित पाटील प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक केली आहे. देवकाते यांना ललित पाटीलकडून आर्थिक मदत केल्याचे तपासात आढळले आहे.
शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथक प्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला होता.या चौकशीत अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते दोषी असल्याचे दिसून आले होते. डॉ. प्रवीण देवकाते यांच्या निगराणीखाली ललित पाटील ससूनमध्ये उपचार घेत होता.ललित पाटील पळून जाण्याचा काही दिवस आधी डॉ. देवकाते यांनी भूषण याच्याशी संपर्क केला होता. वैद्यकीय शिक्षण विभागाने या आधीच देवकाते यांचे निलंबन केले आहे.
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी करण्यात आली होती. ससून रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ज्या डॉक्टरांनी ललित पाटील यांच्यावर उपचार केले त्यांची सखोल चौकशी आणि जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्ड मध्ये दाखल होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली. ललित पाटील पलायन प्रकरणी ससूनमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आला आहे.
