डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येतात. यानिमित्ताने विशेष शासकीय कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते. आज (६ डिसेंबर) चैत्यभूमीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवी आणि अजित पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह अनेक अधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी माहिती दिली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्याठिकाणी दीक्षा घेतली, त्या दीक्षा भूमीवर २०० कोटींची विकासाची कामे सुरू केली आहेत. पवित्र दीक्षा भूमी ही जागतिक दर्जाची वास्तू तयार झाली पाहिजे. कारण दीक्षा भूमी भारतासाठीच महत्त्वाची नसून जगभरातील बौद्ध अभ्यासक या दीक्षा भूमीवर येत असतात. त्याकरता काम सुरू केलं आहे. आज लंडनमधलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं घर महाराष्ट्र सरकारने विकत घेतलं. तिथेही आपण त्यांच्या अतिशय मौल्यवान वस्तू ठेवल्या आहेत”, अशीही माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज भारत अतिशय वेगाने प्रगती करत आहे. आपण जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेलो आहोत. लवकरच जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होणार आहोत. पण याचे श्रेय जर का कोणाला जात असले तर ते खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला जाते. या संविधानाने या देशामध्ये एक अशी व्यवस्था उभी केली की, ज्या व्यवस्थेमुळे मूठभर लोकांनाच नाही तर सकल बहुजनांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाच्या मुख्य धारेमध्ये समाजातले सर्व लोकं हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आले. म्हणूनच आज ही प्रगती होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा संविधानाचा उल्लेख केला आहे. मला कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे अधिक महत्वाचे हे पंतप्रधानांनी सांगितले आहे, असेही यावेळी फडणवीसांनी सांगितले.
