खासदारांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकाराचाच महुआ मोईत्रांनी मांडला धंदा, आत्तापर्यंतच्या ५१ प्रश्नांपैकी ५० हिरानंदांनींसाठी

लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपावरून तृणमूल कॉग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे. खासदारांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारांचाच त्यांनी धंदा मांडला होता. २०१९ मध्ये खासदार झाल्यापासून मोईत्रा यांनी ५१ प्रश्न विचारले होते. यापैकी ५० प्रश्न हिरानंदानी ग्रुपसाठी विचारल्याचे उघड झाले आहे.

संसदेच्या नैतिक समितीने (एथिक कमीटी) मोईत्रा यांची खासदारकी रद्द केल्यावर द्रौपदीचे वस्त्रहरण झाल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या खासदार हिना गावित यांनी मोईत्रा यांना जोरदार उत्तर देत त्यांच्या पापांची कुंडलीच लोकसभेत मांडली. देशाच्या इतिहासात आत्तापर्यंत १३ खासदारांना अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र, मोईत्रा यांच्याइतका गंभीर गुन्हा कोणीही केलेला नाही. मोईत्रा यांनी खासदार झाल्यापासून ५१ प्रश्न विचारले आहेत. अनेक प्रश्नांवर त्यांनी लोकसभेत आक्रमक रुप धारण केले. मात्र, संसदेच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार यातील ५० प्रश्न हे केवळ हिरानंदानी ग्रुपसाठी विचारले होते. हिरानंदानी ग्रुपला शिपींग, रिअल इस्टेट, पेट्रोकेमीकल या विषयांत इंटरेस्ट होता. नेमके त्याच विषयांवरील प्रश्न मोईत्रा यांनी विचारले आहेत. हिरानंदानी ग्रुपला फायदा व्हावा यासाठी त्यांनी हे केले आहे.

मोईत्रा यांचा गंभीर अपराध म्हणजे त्यांनी खासदार म्हणून प्रश्न विचारण्यासाठी संसदेच्या पोर्टलचा मिळालेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड दुसऱ्याला दिला. विशेष म्हणजे हे त्यांनीच स्वत: कबुल केले आहे. संसदीय कामकाज विभागाकडून हा पासवर्ड देताना तो कोणालाही देणार नाही, असे खासदाराकडून लिहून घेतले जाते. त्याचाही भंग मोईत्रा यांनी केला. आपल्याला मोईत्रा यांनी लॉग इन आयडी आणि पासवर्ड दिल्याचे हिरानंदानी यांनी दुबईतील भारतीय राजदूतासमोर प्रतिज्ञापत्र देऊन कबुल केले आहे.

धक्कादायक म्हणजे त्यांचे प्रश्न विचारण्यासाठीचे अकाऊंट ४७ वेळा दुबईतून आणि सहा वेळा इंग्लंड, अमेरिका आणि नेपाळमधून लॉग इन झाले. भारतीय खासदाराचे परदेशातून लॉग इन करून त्यांनी एका अर्थाने देशद्रोहच केला. त्यातही मोईत्रा स्वत: नव्हे तर दुसरेच कोणीतरी त्यांचा खासदारकीचा प्रश्न विचारण्याचा अधिकार वापरत होते हे देखील सिध्द झाले आहे. कारण एकाच दिवशी दिल्ली, बंगळुरू, दुबई आणि इंग्लंड या चार ठिकाणांहून त्यांचे अकाऊंट लॉग इन झाले. महुआ मोईत्रा यांच्या अनैतिक वर्तनामुळे संपूर्ण जगात भारतीय खासदारांची प्रतिमा खराब झाली आहे. पैसे दिल्यावर खासदार प्रश्न विचारतात, संसदेत जोरजोरात भांडतात असा संदेश गेला आहे, असा आरोप खासदार हिना गावित यांनी केला आहे.