राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. एसआयटी स्थापन होऊन आजच नोटिफिकेशन जारी होणार असल्याचं कळतंय. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून विवेक फनसळकरांची संयुक्त आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. 8 जूनच्या रात्री दिशा सालियानने 40 फोन कॉल केलेला तो नंबर कुणाचा, या मथळ्याखाली तपास सुरू होणार आहे. त्यामुळे – आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा 14 जून 2020 रोजी मृत्यू झाला होता. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या पाच दिवस आधी त्याची आधीची मॅनेजर दिशा सालियन हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मालाडमधील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा संबंध असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.
