ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. ड्रग्ज कारखाना प्रकरणात अटक करण्यात आल्यावरही ललित पाटीलला एकही दिवस पोलीस कोठडी मिळाली नाही. पोलीस आयुक्तांनी पत्राद्वारे परवानगी मागूनही तत्कालीन ठाकरे सरकारने उच्च न्यायालयात अपीलाची परवानगी दिली नव्हती, याचे पुरावेच फडणवीस यांनी सादर केले आहेत.
विधान परिषदेत ललित पाटील प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी पश्न विचारला होता. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला यातील राजकारणात जायचे नाही. मात्र, आपल्याला एक पत्र दाखवितो. २ एप्रिल २०२१ रोजी पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सरकारला पाठविले होते. त्यामध्ये ललित पाटीलला अटक झाल्यानंतर त्याची पोलीस कोठडी घेण्याची आवश्यकता होती. मात्र, ती घेतली नाही.
ठाकरे सरकारला पत्र पाठवले होते. ललित पाटीलला एक दिवसाची ही पोलीस कोठडी न मिळता थेट न्यायालयीन कोठडी देण्यात आली.याबाबत उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी मागितली होती. मात्र राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ही परवानगी नाकारली. यामागे कोण होते असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
