नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करून काय दिवे लावणार? असं वक्तव्य केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. याच विधानावरुन अजित पवारांवर संजय राऊत यांनी टीका करताना संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीचा संदर्भ देत बेरोजगारीच्या मुद्द्यावर हे घुसखोर घोषणा देत होते असं म्हणत अजित पवारांना टोला लगावला. पीएचडीसंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या भाजपाच्या उमुख्यमंत्र्यांनी यांनाही मार्गदर्शन करावं असं म्हणत टीका केली. या टीकेला अजित पवारांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
पीएचडी संदर्भात मी काल जी भूमिका मांडली. त्याचा विपर्यास करण्यात आला. मी याआधीही सभागृहात भूमिका मांडली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती केली होती. त्या समितीने सारथी, महाज्योती, बार्टी किती विद्यार्थ्यांना संधी दिली पाहिजे. याबाबत अभ्यास केला. मला कुणावर टीका करायची नाही. पण काही लोक राजकीय नेत्यांवर पीएचडी करत आहेत. त्या नेत्यांची मी नावं घेत नाही. पण पीएचडी एक महत्वाचा अभ्यास विषय आहे. त्यात खूप अभ्यास करावा लागतो. त्यामुळे पीएचडीचा विषय तसा हवा, असं अजित पवार म्हणाले.
राज्यात निर्माण झालेला कांदा प्रश्न, इथेनॉल प्रश्न तसेच दूध दराचा प्रश्न याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. काल अमित शाह यांची आम्ही वेळ मागितल्याचे अजित पवार म्हणाले. त्यानुसार अमित शाह यांनी आम्हाला वेळ दिली आहे. शुक्रवारी म्हणजे 15 डिसेंबरला आम्ही विधीमंडळाचे कामकाज संपल्यावर दिल्लीला जाणार आहोत. तिथे रात्री 9 किंवा 10 वाजता अमित शाह यांची भेट घेतली जाणार असल्याच अजित पवार म्हणाले.
आपल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, यासाठी सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेईल. २०३१-३२ पासून जुनी पेन्शनची अंमलबजावणी होणार आहे. त्यांचे काही मुख्यमंत्र्यांनी निकाली काढले. कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे की सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा. मात्र, आम्ही संप मागे घेण्याचे आवाहन केले असून चर्चेतून यावर तोडगा निघेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
