पाच राज्यांचे निकाल लागल्यानंतर भाजपचा प्रचंड आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे भाजपने आता लोकसभेची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपने जिल्ह्याजिल्ह्यात तयारी सुरू केली आहे. भाजपला निवडणुकीत मिळणारं यश कायम असल्याने भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या नजीकच्या काळात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये महाभूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नुकतंच नांदेड दौऱ्यावर गेले होते. ‘१०० वॉरियर्स’च्या बैठकीच्या निमित्त त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच कार्यक्रमातून बावनकुळेंनी काही काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख करत ते भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे, याबाबतचा दावा भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला. ते नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोक चव्हाण भाजप मध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत प्रवेश करणार असल्याचे सांगितले. दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी मुखेड आणि नांदेड मध्ये १०० सुपर वॉरियर्सशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेकजण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे आपल्या भाषणात म्हणाले.
दरम्यान, चिखलीकर यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक विधान केलं आहे.आम्ही कुणाकडे जात नाही, पक्ष फोडायला जात नाही. पण कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्यांचं स्वागतच आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
