राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अमोल कोल्हे यांचं नाव न घेता त्यांना पाडणार असल्याचं अजित पवार म्हणाले. पाच वर्षात एका खासदाराने त्याचा मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होतं. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे.निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे कोणाला पद यात्रा सूचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे, असा टोला लगावतानाच आम्हाला वाटले होते ते उत्तम वक्ते आहेत. संभाजी महाराजांची भूमिका त्यांनी उत्तम बजावली होती. पण शिरूरमध्ये आम्ही पर्याय देणार. तुम्ही काळजीच करू नका. तिथे असलेला उमेदवार निवडूनच आणणार, असं अजित पवार यांनी म्हटलंय.
एका खासदाराने मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असते. एक खासदार माझ्याजवळ येऊन दीड वर्षापूर्वी माझ्याजवळ येऊन मला राजीनामा द्यायचा आहे असे सांगत होता. त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे. त्या खासदाराला निवडणून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटील यांनी जीवाचं रान केलं आहे. त्यांना खासगीत बोलवा. आता त्यांचे सगळं चाललेलं आहे. पण मधल्या काळात ते सहाही विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते. त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. त्यांनी मला आणि त्यावेळेसच्या वरिष्ठांना सांगितले होते की, मी राजीनामा देत आहे. मी कलावंत आहे. माझ्या सिनेमावर परिणाम होत आहे. माझा सिनेमा चालला नाही. अशाही गोष्टी त्यांनी सांगितलेल्या, असे अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पाणी सर्वात आधी पिण्यासाठी राखीव ठेवा, मग शेतीसाठी वापरा. जुलैपर्यंत पाणी पुरेल असं पाण्याचं नियोजन करायचं आहे. गेल्या वर्षीच्या तुनेत पुण्यातील पाण्याची परिस्थिती बिकट आहे. संपुर्ण राज्यात पाण्याचा साठा कमी आहे. पुढे बोलताना एबीपी माझा आणि सी व्होटरनं केलेल्या सर्वेक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, सर्वेला काहीच आधार नसतो. विधानसभेच्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे सर्वे तुम्ही आठवा आणि निकाल काय लागले तेसुद्धा आठवा. तुम्ही किती लोकांना विचारता आणि कुठल्या भागात सर्वे करता, यावर सर्वेचे निकाल अवलंबून असतात. त्यांनी सर्वे केलेला असला, तरी आमची तीन पक्षांची युती आहे. अजुन आमच्या हातात काही काळ आहे, त्यात आम्ही कुठे आणि कसं वातावरण हे महायुतीच्या बाजूला झुकेल असं काम करू.
सीव्होटरचा सर्व्हे आला आहे. त्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. या सर्व्हेला काही अर्थ नसतो. कुठल्या भागातील हा सर्व्हे झाला आहे ते पाहावं. आम्ही युती केली आहे. आमच्याकडे अजून वेळ आहे आणि वातावरण आमच्याकडे वळेल हे बघू, असं त्यांनी सांगितलं.
