राज्यात आज ३७ नव्या कोरोना रुग्णांची भर, मुंबईत १९ नवीन कोरोनाचे रुग्ण

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होतेय. आज राज्यात ३७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. त्यानंतर ठाणे आणि पुण्यातही दररोज रुग्ण वाढत आहेत. नाताळ आणि नववर्षामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने घाबरु नका.. खबरदारी घ्या…असे आवाहन केले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज एकही जेएन.१ या सबव्हेरियंटचा रुग्ण आढळला नाही. राज्यात सध्या जेएन.१ व्हेरियंटचे १० रुग्ण आहेत.

राज्यात मंगळवारी ३ हजार ६७० नमुन्यांपैकी ५५७ आरटी- पीसीआर आणि ३ हजार ११३ आरएटी चाचण्या घेण्यात आल्या. एकूण संक्रमित रुग्णांपैकी बहुतेक ओमिक्रॉन प्रकाराने ग्रस्त आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात सर्वाधिक लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली. या वर्षी आतापर्यंत एकूण १ हजार ९७२ जणांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. यातील १९ जणांचा मृत्यू झाला.

राज्यातील रुग्णांची संख्या ८१ लाख ७२ हजार २०० इतकी झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सोमवारी २८ नवे रुग्ण सापडले असताना मंगळवारी त्यात वाढ होऊन ३७ नवे रुग्ण सापडले. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १९, पुणे ६, हिंगोली ३, रायगड व नवी मुंबईमध्ये प्रत्येकी २, ठाणे मनपा, जळगाव, कोल्हापूर मनपा, नांदेड, नागपूर मनपामध्ये प्रत्येकी एक करोनाचा रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची संख्या ८१ लाख ७२ हजार २०० इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात आज 116 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन रुग्णांचा मृत्यू झालाय. तिन्ही रुग्ण कर्नाटकमधील आहेत. मागील २४ तासांत २९३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील सक्रीय रुग्णांची संख्या ४१७० इतकी झाली आहे.