चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. वाघांच्या भूमीत खेळाडू वाघांसारखा पराक्रम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मिशन ऑलिम्पिक 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू पदक मिळवतील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेतले आहेत. खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत, असे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
संपूर्ण देशभरातून येथे खेळाडू आले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन ऑलिम्पिक 2036 चे लाँचिंग येथे करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.सुरवातीला मान्यवरांनी बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मनजित कुमार या खेळाडूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपूर्द केली. यावेळी संदीप गोंड या खेळाडूने शपथ दिली.
अभूतपूर्व उद्घाटन सोहळा : उद्घाटन समारंभात शाल्मली खोलगडे यांनी सादर केलेला ‘लाइव्ह’ परफॉर्मन्स सोबतच फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले.
खेळाडूंचे ध्वजसंचलन : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी ध्वजसंचलन करीत आपापल्या राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1551 खेळाडू दाखल झाले आहेत.
चंद्रपूर गॅझेटिअर व ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ पुस्तिकेचे विमोचन : चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर प्रथमच मराठी भाषेत प्रकाशित होत आहे. या गॅझेटिअरचे तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
