महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मोठे आहे. मराठी नाट्यपरंपरा प्रगल्भ आहे. १०० व्या नाट्य संमेलनासाठी शासनाने ९ कोटी, ३३ लाख रूपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असून, या माध्यमातून जिल्हास्तरावर नाट्यसंस्कृती जोपासावी. मराठी नाट्यक्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
१०० व्या नाट्य संमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विष्णुदास भावे नाट्य विद्या मंदिर येथे आयोजित या कार्यक्रमास कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, खासदार संजय पाटील, १०० वे नाट्य संमेलन स्वागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुधीर गाडगीळ, प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे अध्यक्ष प्रशांत दामले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, मराठी प्रयोग परीनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले, नाट्य परिषद सांगली शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
१०० व्या नाट्य संमेलनासाठी शुभेच्छा व्यक्त करून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला प्रगल्भ नाट्यपरंपरा आहे. ही नाट्यसंस्कृती रसिकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचावी, हा नाट्यसंमेलनाचा उद्देश आहे. मराठी रंगभूमी, नाट्यसंस्कृती जनतेच्या हृदयाच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोहोचवावी. शासन नाट्यकर्मींच्या पाठीशी आहे. दर्दी रसिकांच्या पाठिंब्यावर मराठी रंगभूमी एक हजाराव्या नाट्यसंमेलनाचा टप्पा गाठेल. याच विचाराने संबंधित सर्वांनी कृती करावी, असे ते म्हणाले.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाटक हृदयापर्यंत आशयभाव पोहोचवते. नाटकामध्ये मेडिटेशन म्हणजेच एकाग्रता करण्याची ताकद आहे. २१ व्या शतकात विविध आव्हानांवर मात करून नाटककार, कलावंत आणि रसिकांनी नाट्यसंस्कृती पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत. नाट्यसंमेलनामध्ये रंगभूमीपुढील आव्हाने व त्यावर मात करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ८६ नाट्यगृहे असून त्यापैकी ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांची आहेत. नगर विकास विभागाकडून सदर ५२ नाट्यगृहांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्याचबरोबर राज्यात नवीन ७५ सौर ऊर्जा वापरणारी अत्याधुनिक चित्र नाट्य मंदिरे उभारण्यासाठी मंजुरी प्राप्त असून, नाट्यगृहांमध्ये कलाकार व रसिक प्रेक्षकांना अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच ही नाट्यगृहे अल्प दरात उपलब्ध करून देण्यात येतील, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून राज्यातील सर्व जिल्ह्यात त्यांच्या जीवनावरील महानाट्य दाखवण्यात येणार आहे. तसेच, महासंस्कृती अभियानातून स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, याअंतर्गत नाटके प्रायोजित करावीत, असे त्यांनी सूचित केले. तसेच नाट्यप्रयोगांसाठी अनुदान देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
