शिवछत्रपतींचा जीवनपट चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आमच्या मनात जोश, वर्तनात आदर्श आणि मनामनात ऊर्जा निर्माण करत राहणार आहे. शिवचरित्र युगानुयुगे आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत्र राहणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून आज शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य ‘जाणता राजा’ या प्रयोगाचा राज्यस्तरीय शुभारंभ हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हा शुभारंभ झाला.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जायस्वाल, माजी खासदार विकास महात्मे, महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्याने अतिशय समर्पक भूमिका घेत राज्यभर हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणता राजाचा राज्यस्तरीय पहिला प्रयोग नागपूर येथे होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाची सुरुवात केली होती, याचे देशभर शेकडो प्रयोग झाले, नागपुरातही अनेक प्रयोग झाले, मात्र दरवर्षी हे नाटक आपल्याला बघावसे वाटते इतके प्रेरणादायी आहे.

जेव्हा आमचे अस्तित्वच नाकारले गेले होते त्यावेळेस शिवरायांनी अतुलनीय पराक्रम गाजवत दडपशाहीला मिटवून टाकले. त्यामुळे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत शिवरायांचे चरित्र आम्हाला प्रेरणादायी असेल. ते कायम आम्हाला ऊर्जास्त्रोत असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.