बाळासाहेब ठाकरेच खरे वाघ होते पण, उद्धव ठाकरे खरे वाघ नाहीत; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

देवेंद्र फडणवीस म्हणतात ते कारसेवेला गेले होते. मशीद पडली तेव्हा ते अयोध्येत होते. पण फडणवीस यांचं वय तेव्हा काय होतं? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. मी अवघा वीस वर्षाचा असताना कारसेवेला गेलो होतो. एकदा नाही तीनदा गेलो होतो. बाबरीचा ढाचा पडला तेव्हा मी तिथेच होतो, असं सांगतानाच पण उद्धवजी, तेव्हा तुम्ही कुठे होता? कारसेवक छाताडावर गोळ्या झेलतो होते, तेव्हा तुम्ही जंगलात जाऊन फोटो काढत होता, अशी खरपूस टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठाण्यातील आनंदनगर परिसरातील ठाणे महापालिका मैदानात परिसरात राम कथा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात राम मंदिरावरुन देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर सडकून टीका केली.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला खूप आनंद झाला, तुमचे दर्शन घेण्यासाठी इथे आलो आहे. आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की, राम मंदीर होत आहे. बाबरने आपले राम मंदिर पाडले आणि बाबरी मशीद बांधली. सगळ्या लोकांना ही मशीद टोचत होती. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापना केली. त्यामुळे पुन्हा एकदा स्वाभिमान निर्माण झाला. बाबरीचा ढाचा आपल्याला टोचत होता. 6 डिसेंबरला या मशिदीचा ढाचा पडला आणि छोटे राम मंदिर बांधण्यात आलं.

मीही अभिमानाने सांगतो मी कारसेवक आहे. पहिल्या कारसेवेला 20व्या वर्षी गेलो होतो. त्यावेळी बदायूच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. दुसऱ्या कारसेवेच्यावेळी जेव्हा कलंकित ढाचा खाली आला तेव्हा मी तिथेच होतो. एवढेच नव्हे तर अटलजींच्या काळात तिसरी कारसेवा झाली. तेव्हाही मी तिथे होतो. कारण मी कारसेवक आहे, राम सेवक आहे. उपमुख्यमंत्री म्हणून माझा परिचय दुसरा आहे. त्यापेक्षा महत्त्वाचा परिचय रामसेवक आणि कारसेवक म्हणून आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे हे खरे वाघ होते मात्र तुम्ही वाघ नाही आणि तुमच्यासोबत असलेलाही कोणी वाघ नसल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थेट इशारा देत म्हणाले की, तुमच्यासोबतचा एक असा नेता दाखवा जो कारसेवक म्हणून तो बाबरीच्या ढाचा पाडताना उपस्थित होता अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राम मंदिरावरून हा मुद्दा आणखी पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाण्यातील काही महाभाग म्हणतात, राम काय खात होते. आता राम काय खात होते हे सर्व बाजूला ठेवा पण, तुम्ही नक्की शेण खाता, हे आता आमच्या लक्षात आले आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. रामायणमध्ये मंथरा होती, तसे उद्धव ठाकरे यांच्याकडेही मंथरा आहे. रामयनमध्ये पुण्यवान दशरथ राजा होते. पण तुमच्याकडे तसे काहीच नाही. त्यामुळे मंथरामुळे तुमचे काय होईल माहीत नाही, असा टोला लगावत त्यांनी संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.