श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्काराची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. खासदार उदयनराजे भोसले हे पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक आहेत.
उदयनराजे भोसले यांनी काल सातारा शहरातील सैनिकी स्कूलच्या मैदानाची पाहणी केली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यांचा दौरा निश्चित झाल्याचे स्पष्ट असून त्यांचा हा सातारा जिल्ह्यातील दुसरा दौरा असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्य साधून 19 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साताऱ्याच्या दौऱ्यासाठी उदयनराजे भोसले यांनी निमंत्रित केले होत आणि त्यांनी येण्याचा शब्द दिला होता. त्यानिमित्ताने राजधानी साताऱ्यातील राजघराण्याच्या वतीने देण्यात येणारा सर्वात मानाचा पहिला शिवसन्मान पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.
2019 मध्ये झालेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उदयनराजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम साताऱ्यात येत प्रचारसभा घेतली होती. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे साताऱ्यात येणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 वेळा महाराष्ट्र दौ-यावर येण्याची शक्यता आहे. 5, 11 आणि 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्रात येणार असल्याचं बोललं जातं आहे. 5 फेब्रुवारीला जळगाव, 11 फेब्रुवारीला यवतमाळ आणि 19 फेब्रुवारीला पुणे, नागपूर असा दौरा करण्याची शक्यत आहे. नरेंद्र मोदी यवतमाळमध्ये महिला बचत गटाच्या मेळाव्याला संबोधित करतील तर नागपुरात भाजपच्या अनुसूचित जाती आघाडीतील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करतील अशी माहिती समोर आली आहे.
लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची प्रगती केली. ज्याचे नाव जगाच्या पाठीवर घेतले जातेय, त्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी देणं लागतो, म्हणून हा शिवसन्मान देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तसेच 350 व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांची ऑनलाईन उद्घाटने, लोकार्पण होणार आहेत. 2019 प्रचार सभेत सातारा जिल्ह्यातील विकासकामे करण्याचा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिला होता. त्यांनी तो पाळला आहे. या विकासकामात कास पठाराचा वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश तसेच जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळाचा विकास, कास तलाव, जिहे कटापूर योजना आदी विकासकामांची ऑनलाईन उद्घाटने होणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
