मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा 10.50 टक्के वाढ

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला आहे. प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा 59954.75 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प 10.50 टक्क्यांनी अधिक वाढला आहे. गेल्या वर्षासाठी 54256.07 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मुंबई महानगरपालिका यंदाच्या अर्थसंकल्पात बेस्ट प्रशासन, मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पासाठी मोठी तरतूद केली आहे.

आरोग्य खात्यावर भर
मुंबई महानगरपालिकेच्या सायन, केईएम, नायर या रुग्णालयायामध्ये आयव्हीएफ उपचारपद्धती सुरू होणार आहे. 110 कोटी रुपयांचे थ्री टेसला एमआरआय मशीन मुंबई महानगरपालिका खरेदी करणार आहे. रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीसाठी 306 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 23.46 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. सन 2024-25 मध्ये, 6 अतिरिक्त पॉलिक्लिनीक व डायग्नॉस्टिक सेंटर्स आणि 54 “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना’ सुरू करण्याचा प्रस्ताव होता. तसेच, फिजिओथेरपिस्ट आणि कान, नाक, घसा तज्ज्ञांच्या सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

कोस्टल रोडसाठी 2900.97 कोटींची तरतूद
मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प (कोस्टल रोड) दक्षिण पॅकेज 1,2 आणि चारची सर्व कामे प्रगतीपथावर असून 24 डिसेंबर 2023 पर्यंत 83.34 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई पालिकेकडून देण्यात आली. पॅकेज चारमधील बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून आंतरबदलाचे पॅकेज 1 मधील 99 टक्के आणि पॅकेज 2 मधील 69 टक्के काम पूर्ण झाले आहे. वरळी कोळीडावाड येथील कोळी बांदवांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या निर्देशानुसार समिती नियुक्त केली होती, व समितीच्या अहवालानुसार दोन खांबांमधील अंतर 60 मीटरवरून1 20 मीटकर करण्यात आले आहे. त्यामुळे कोळी बांधवांनैा मच्छिमारीकरता समुद्रात ये-जा करणे सुलभ होणार आहे. मुंबई महापालिकेतर्फे सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचा भाग फेब्रुवारी 2024 पासून सुरू करण्याचा प्रयत्न असून मे २०२४ पर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे निर्धार करण्यात आला आहे. 2023-24 च्या सुधारित अंदाजात 3 हजार कोटी आणि सन 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाजात 2900.97 कोटी इतकी तरतूद प्रस्तावित आहे.

यासोबत शिक्षण विभागासाठी 2024-25 या आर्थिक वर्षात 3167.63 कोटींची तरतुद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद 3027.13 कोटी इतकी होती. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी 4878.37 कोटी तर अग्निशमन दलासाठी 689.99 कोटी रुपयांची करण्यात आली आहे. तर आरोग्य खात्यासाठी 1915.12 कोटी रुपयांची तर रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 4350.96 कोटींची तरतूद केली गेली आहे.