जून २०२२ मध्ये महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक झाली. शिवसेनेच्या संजय पवारांना धोबीपछाड देऊन भाजपचे धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडून आले. राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रतिष्ठेची ठरलेली सहावी जागा भाजपने जिंकून आणली. यामागे देवेंद्र फडणवीस यांची रणनीती होती.
वास्तविक संख्याबळाचे गणित पाहता महाडिक यांचा विजय अवघड होता. मात्र महाडिक यांच्या म्हणण्यानुसार नेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनितीमुळं भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. कारण, फडणवीस साहेबांच्या डोक्यात संख्याबळाचं गणित असल्याशिवाय माझं नावच घोषित झालं नसते. त्यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे नेतेही विरोधात होते. आता तर ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. त्यामुळेच फडणवीस काय करतात याची धास्ती आहे.
२७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणूक सहा खासदारांसाठी प्रत्येकी ४८ मतांचा आहे कोटा भाजपचा चौथा उमेदवार उभा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या वेळेस सारखा चमत्कार घडवू शकतात, या राजकीय भीतीपोटी ठाकरे आणि पवार यांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यसभा निवडणुकीचे असे आहे समीकरण, महाराष्ट्रात २८८ आमदार आहेत. ६ खासदारांसाठी प्रत्येकी ४८ मतांचा कोटा असेल, सध्या भाजपकडे १०४ आमदार आहेत. महायुतीतील मित्रपक्ष शिंदेसेना ४०, अजित पवार गट ४०, भाजप व शिदसेना समर्थक २० अपक्ष असे एकूण २०७ हुन अधिक आमदारांचे बळ महायुती महावृतीकडे आहे. त्यामळे त्यांचे ४ खासदार सहज निवडून येऊ शकतात.
भाजपकडे सध्या जवळपास ११० आमदारांचा पाठिंबा आहे. त्यात भाजप १०४ आणि ६ अपक्ष आहेत. अशा प्रकारे या राज्यसभा निवडणुकीत आणखी दोन मित्रपक्षांच्या मदतीने भाजप स्वबळावर आणखी एक उमेदवार निवडून आणण्याच्या स्थितीत आहे. शिवसेना एकनाथ शिंदि गटाकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. देवरा हे महायुतीचे चौथे उमेदवारही असू शकतात, अशीही चर्चा आहे. असे झाल्यास काँग्रेस आमदारांचे क्रॉस व्होटिंग होण्याची दाट शक्यता आहे. महायुतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडणूक जिंकू शकणार नाही.
राज्यसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची लॉटरी लागली आहे. त्यांच्या कोट्यातून एक उमेदवार निवडणूक जिंकेल हे निश्चित मानले जाते. प्रफुल्ल पटेल यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नवीन नाव समोर आणतात की अनुभवी नेत्याला पसंती देतात हे पाहावे लागणार आहे.
सध्या अनेक नेते काँग्रेसमध्ये एका जागेसाठी दावा करत आहेत. मात्र त्यांच्यातील कोणाकडेही आपल्याकडे असणारी मतेही शाबूत ठेवण्याची ताकद नाही. अन् समोर देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे दुसऱ्या जागेचा प्रयत्न तर सोडाच पण एकच जागा कशीबशी मिळेल यासाठी काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट एकच उमेदवार देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरी आणखी एक धास्ती म्हणजे गेल्यावेळी राज्यसभा निवडणूक झाली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. आताही या निवडणुकीच्या निमित्ताने उरला सुरला उद्धव ठाकरे गट, उरला सुरला शरद पवार गट तरी राहतोय का ही शंका दोन्ही पक्षांना सतावत आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार यांना धक्का दिल्यावर आता काँग्रेसची तर बारी नाही!
