उद्धव ठाकरे मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, उद्धव ठाकरेंचा सपत्नीक ‘वंदे भारत’ रेल्वे प्रवास; भाजपचा उपरोधिक टोला

उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना ठाकरेंनी रेल्वे मार्गाने परत येणे पसंत केले. ठाकरेंनी वंदे भारत ट्रेनने खेड ते मुंबई प्रवास असा सपत्नीक प्रवास केला.वंदे भारत या सेमी हायस्पीड ट्रेनने उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांनी खेडहून मुंबई गाठली. यावेळी प्रवासात त्यांच्यासोबत पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार विनायक राऊत आणि इतर पदाधिकारी सोबत होते.

यावरच आता भाजपने उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक वंदे भारत रेल्वेतून केलेल्या प्रवासावरून त्यांना उपरोधिक टोला हाणला आहे. भाजपने यासंबंधी उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केला. तसेच त्या खाली मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी. वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, अशा ओळी दिल्या. यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत असणारे या भगव्या पक्षाचे राजकीय द्वंद अधिकच धारदार होण्याची शक्यता आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ही नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी प्रकल्प आहे. बुलेट ट्रेन आणि वंदे भारत ट्रेनसाठी मोदी सरकारने मोठे काम केले आहे. त्यामुळे भाजपने उद्धव ठाकरे यांच्या वंदे भारत प्रवासाचे दोन फोटो ट्विट केले आहे. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत विनायक राऊत दिसत आहे. भाजपने म्हटले आहे की, मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदेभारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार….. मोदी सरकार !

दुसऱ्या एका फोटोवर भाजप महाराष्ट्राकडून कॅप्शन दिले गेले आहे की, कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण…भाजपने हे फोटो उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना टॅग केले आहेत.