विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या होणाऱ्या खूनांमुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण आहे. शरद मोहोळ याची महिन्याआधी भरदुपारी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे टोळीयुद्धाचा भडका उडण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र त्याआधी नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे शहरातील टोळ्यांच्या प्रमुख म्होरक्यांना पोलीस आयुक्त कार्यालयात हजर करत करण्यात आलं आहे. गजा मारणे, बाबा बोडके, निलेश घायवळ यांसह अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस मुख्यालयात हजेरी लावली आहे. रेकॉर्डवरील सर्व गुन्हेगारांची आज ओळख परेड करण्यात आलीये.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच पुण्यातील नामचीन गुंडांना पहिलाच दणका दिलाय. पुणे पोलीस आयुक्तालयात जवळपास 200 ते 300 गुन्हेगार यांची परेड करत आयुक्तांकडून सर्वांना तंबी देण्यात आली.पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात सर्व टोळ्यांना समोरासमोर आणून अशा प्रकारे दम भरण्याची ही पहिलीच वेळ आहे.अमितेश कुमार हे नागपूरचे आयुक्त होते. त्यावेळी ते नागपूर शहराच्या गुन्हेगारीवर आळा घालण्यात यशस्वी झाले होते. आता ते पुण्यातील गुन्हेगारी नष्ट करण्याच्या किंवा आळा घालण्याच्या तयारीत दिसत आहे. त्यांनी आल्यावर काहीच दिवसांत गुन्हेगारांची परेड काढली आहे.
पुणे शहरातील जितके पोलिस स्टेशन आहेत, त्यातील सर्व रेकॉर्डवरील सर्व गुंडांना आज आयुक्तालयासमोर बोलावण्यात आले आहे.त्यांना दररोज पोलिस स्थानकात हजेरी लावून ते काय करत आहेत त्यांची माहिती देण्यासाठी सांगण्यात आले आहे. आज हे सर्वजण २ ते ३ तास पोलिस आयुक्तालयासमोर उभे होते. यावेळी नव्या पोलिस आयुक्तांनी सर्व गुन्हेगारांना यावेळी तंबी दिली आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पुणे पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणे यांची भेट घेतली होती. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले होते. त्याचबरोबर, विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली होती.
