काँग्रेसने 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होईल, ते आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंवर जोरदार निशाणा साधला. या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. आताही तुम्ही काहीही न ऐकण्याच्या उद्देशानेच आला आहात. पण मी देखील यावेळी पूर्ण तयारीने आलो आहे. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राज्यसभेत काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या व्हीआयपी कल्चरबाबतही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. लाल दिव्याची संस्कृती का सुरू ठेवली, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसने ब्रिटिश कायदा का बदलला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, काँग्रेसने येत्या निवडणुकीत 40 जागा जरी जिंकल्या तरी भरपूर होतील, ते आज आपल्या चुकांची शिक्षा भोगत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

ज्या काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोठी लोकशाहीचा गळा घोटला, जिने लोकशाहीने निवडून आलेल्या सरकारांना बरखास्त केलं, ज्या काँग्रेसने देशाच्या संविधान आणि लोकशाहीच्या मर्यादांना जेलमध्ये बंद केल्या, ज्यांनी वृत्तपत्रांना टाळे लावण्याचे प्रयत्न केले होते. आता उत्तर आणि दक्षिण भागांना तोडण्यासाठी काहीही वक्तव्ये केली जात आहेत. ही काँग्रेस आम्हाला लोकशाहीवर प्रवचन देत आहे. तुम्ही भाषेच्या नावाने देशाला तोडण्याचा प्रयत्न करत आहात. ज्यांनी ईशान्य भारताला हिंसेत ढकललं आहे, ज्यांनी नक्षलवाद हे एक आव्हान तयार करुन सोडलं आहे. देशाची जमीन शत्रूंच्या नावाने केली. देशाचं सर्व आधुनिकरण रोखलं. आम्हाला आज राष्ट्रीय सुरक्षेवर भाषण देत आहोत, जे स्वातंत्र्यानंतर नेहमी कन्फ्यूज राहिले आहेत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी लगावला.

धोरण लकवा ही तर काँग्रेसची ओळख झाली होती. मात्र आमचं सरकार तसं नाही. आमच्या निर्णयाक निर्णयांबाबत देश आमची आठवण काढतो आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन देशाला संकटांमधून बाहेर घेऊन आलो आहोत. देश आम्हाला उगाच आशीर्वाद देत नाही हे लक्षात घ्या. आपल्या सदनात ब्रिटिशांची आठवण काढण्यात आली. राजे-महाराजे इंग्रजांच्या बाजूने असणारेही होते. इंग्रजांपासून प्रेरणा कुणी घेतली? काँग्रेसचा जन्म कसा झाला हे मी विचारणार नाही.

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्याचीही काँग्रेसची तयारी नव्हती. उलट जेव्हा भाजपच्या समर्थनानं दुसरं सरकार स्थापन झालं तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आला, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.