मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला रामराम केला. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून सिद्दीकी पितापुत्र काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती. तसे संकेतही बाबा सिद्दीकी यांनी दिले होते. तर त्यांचे पुत्र झिशान यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. आज बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना काँग्रेसला धक्के बसू लागले आहेत.माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काही दिवसांपुर्वीच पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
“मी तरुणपणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तत्काळ राजीनामा देत आहे. मला व्यक्त करायचे आहे असे बरेच काही आहे, पण या म्हणीप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या गेलेल्याच बऱ्या. या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो,” असे बाबा सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फारशी ताकद नाही. पक्षात फूट पडल्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक उघडपणे कोणत्याही गटात गेलेले नाहीत. अजित पवारांना मुंबईत मुस्लिम चेहऱ्याची गरज होती. त्यामुळे बाबा सिद्दीकी अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी विद्यमान आमदार आहे. झीशान अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगली होती. पण झीशान यांनी त्यात तथ्य नसल्याचं म्हटलं. अजित पवारांशी आपले सलोख्याचे संबंध आहेत. आपल्या कठीण काळात त्यांनी साथ दिली, असं झीशान सिद्दीकी यांनी म्हटलं होत.
