राष्ट्रवादी कॉग्रेसचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार गट नव्या बोधचिन्हाच्या शोधात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्ष या बोधचिन्हावर राष्ट्रवादीचा डोळा आहे. मात्र, याला विश्व हिंदू परिषदेच्या “वटवृक्षा”ने खोडा घातला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निवडणूक आयोगाकडे आपल्यासाठी वटवृक्ष हे चिन्ह मागितल्याची बातमी समोर येताच विश्व हिंदू परिषदेने वटवृक्ष हे चिन्ह गेल्या 60 वर्षांपासून आमचे आहे. ते कुठल्याही राजकीय पक्षाला देऊ नये. तसे दिल्यास समाज मनात संभ्रम निर्माण होईल, अशा आशयाचा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ नाव आणि चिन्ह घड्याळ हे निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला सोपविल्यानंतर शरद पवारांच्या गटाला आयोगाने “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार” असे नाव दिले. परंतु, अद्याप चिन्ह दिलेले नाही. शरद पवारांच्या गटाने वटवृक्षाचे चिन्ह आपल्या पक्षाला मिळावे, अशी मागणी निवडणूक आयोगाने केली आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजे 1964 पासून वटवृक्ष हे त्यांचेच चिन्ह आहे. त्याची अधिकृत नोंद देखील आहे. विश्व हिंदू परिषदेने वटवृक्ष चिन्हासह रजिस्ट्रेशन केले आहे. शरद पवार गटाला वटवृक्ष हे चिन्ह दिले, तर समाज मनामध्ये संभ्रम निर्माण होईल, असे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे आणि तेच अर्जामार्फत परिषदेने निवडणूक आयोगापर्यंत पोहोचविले आहे. त्यामुळे निवडणूक आयोग कोणता निर्णय घेतो?? शरद पवारांना वटवृक्ष हे चिन्ह बहाल करतो की त्यांना दुसरा पर्याय निवडायला सांगतो??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
