राज्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळाच्या इमारतीचे भूमीपूजन व “मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजनेचा” (मेडिक्लेम पॉलिसी) शुभारंभ हॉटेल टिप-टॉप प्लाझा येथे झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, माजी आमदार रविंद्र फाटक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बिपिन शर्मा, सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, विजय राठोड, एमआयटीएलचे एम.डी. मल्लिकनेर, स्थानिक पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात उद्योगांना चालना मिळण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध पाहिजेत. राज्यात उद्योगांना गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण आहे. आपल्या राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले पाहिजेत, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपण सर्वांनी गतिमानतेने कामे केली पाहिजेत. आज महाराष्ट्र एफडीआय मध्ये क्रमांक 1 चे राज्य आहे. उद्योगांसाठी असलेली ध्येय-धोरणे सुटसुटीत असली पाहिजेत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वागळे औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक पी-42 येथे बहुस्तरीय वाहनतळ इमारतीमध्ये पार्किंग व्यवस्था वाढविली पाहिजे. एमआयडीसीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या 8 वी ते 10 वी च्या पाल्यांला दरवर्षी टॅबचे वाटप करण्यात येणार आहे. औद्योगिक विकास महामंडळातील 450 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री मऔविम कर्मचारी आरोग्य विमा योजना (मेडिक्लेम पॉलिसी) सुरु करण्यात आली. हा एक चांगला उपक्रम एमआयडीसीने राबविला आहे.
राज्यात कॅशलेस आरोग्य सेवा संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. “शासन आपल्या दारी” या उपक्रमातून शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 2 कोटी 8 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. प्रशासन त्यासाठी दिवसरात्र काम करीत आहे, एकही लाभार्थी योजनेपासून वंचित राहायला नको, यासाठी सर्वजण काम करीत आहेत. स्वच्छता मोहिमेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधी मधून गरजू रुग्णांना आतापर्यंत 2.5 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.
