अवकाळीमुळे बळीराजा पुन्हा संकटात; विदर्भात गारपिटीने पिके आडवी

महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसाला आहे. विशेष म्हणजे विदर्भात अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. खूप मेहनतीने, मन लावून, कष्ट करुन पिकं वाढवली, पण ऐनवेळी पिकं मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे. शेतकरी एकीकडे हमीभावासाठी वर्षानुवर्षे झगडत आहेत. त्यांचा परिस्थितीशी संघर्ष सुरु आहे. असं असताना अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या नशिबाची पुन्हा थट्टा केली आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गिरपिटीने शिवारात उभ्या असलेल्या पिकांना अक्षरश: जमिनदोस्त केलं आहे.

येत्या काही दिवसात राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अवकाळी पावसाच्या पुनश्च आगमनाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते हलक्या स्वरूपात पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा दिला आहे. पावसाच्या ढगांनी दाटी केल्याने विदर्भातील तापमानात घट झाली असून या पावसाचा संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांसह नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील देण्यात आल्या होत्या.

अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे, धामनगाव रेल्वे आणु अन्य काही तालुक्‍यात गारपीट तसंच पाऊस झाला. वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात देखील गारपीट व पाऊस पडल्याची नोंद आहे. दरम्यान, सोलापूर येथे रविवारी २४ तासांमध्ये राज्यातील उच्चांकी ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, सांगली आणि परभणी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झालीय.यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून गारपिटीचा कहर सुरू आहे. काल सलग दुसऱ्या दिवशीही बाभुळगाव, आर्णी, महागाव आणि उमरखेड या तालुक्यांना गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. हजारो गावातील शेतकऱ्यांचं यात अतोनात नुकसान झालंय.

नागपूरलाही मध्यरात्रीच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. रात्री बारानंतर उत्तर नागपुरातील गोधनी, मानकापूरसह अनेक भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने आलेल्या सोसाट्याचा वाऱ्यासह जवळपास अर्धा तास टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला.