आजपासून नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करतोय, भाजपमध्ये जातोय – अशोक चव्हाण

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अशोक चव्हाण आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. अशोक चव्हाण यांनी स्वत: यावर शिक्कामोर्तब केलय. काल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच म्हणजे कालच त्यांचा भाजपा प्रवेश होईल अशी चर्चा सुरु झाली होती. पण काल त्यांनी या वृत्ताच खंडन केलं होतं. आता अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये आज प्रवेश करणार असल्याच म्हटलं आहे. भाजपा प्रवेशाआधी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले आजपासून मी माझ्या राजकीय आयुष्याची पुनश्च: नव्याने सुरुवात करत आहे. आज मी रितसर भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत आहे. आता कोण काय बोलतंय हे मला बघायचं नाही त्यावरती मी नंतर बोलेल. आज पक्ष प्रवेश होईल. त्यानंतर उद्या सर्व गोष्टींवर मी सविस्तर बोलेन, असं चव्हाण म्हणाले. अशोक चव्हाण भाजप कार्यालयात रवाना झाले असून फडणवीस आणि बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होईल.

दरम्यान, अशोक चव्हाणांसह काही आमदार जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, त्यांच्याबरोबर इतर कोणतेही आमदार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं असून या पक्षप्रवेशासाठी मी कोणालाही आमंत्रित केलेलं नसल्याचंही ते म्हणाले. तसंच, काँग्रेसचा राजीनामा दिलेले अमर राजूरकरही आज भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? असा प्रश्न विचारला असता अशोक चव्हाण म्हणाले, तो विषय आता संपला आहे. यासंदर्भात मी आता तुमच्याशी दुपारी बोलेन.

अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे. मराठवाडा खासकरुन नांदेड जिल्ह्यातील ते एक वजनदार नेते आहेत. अशा नेत्याची सोडचिठ्ठी हा काँग्रेसला धक्का आणि भाजपाची ताकद वाढवणारा आहे.