माजी मंत्री बबनराव घोलपांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेकडून पाचवेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. बबनराव घोलप यांनी शिवसैनिक पदाचा राजीनामा दिलाय. “मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितलं, ते प्रामाणिकपणे केलं आहे” असं बबनराव घोलाप यांनी म्हटलय. “अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन मला काढून अपमानित करण्यात आलं. मी जे निष्क्रीय पदाधिकारी काढले होते, नवीन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले हे कितपत योग्य आहे” असं बबनराव घोलप यांनी म्हटलं आहे.

बबनराव घोलप यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद ठाकरे गटाकडून काढून घेण्यात आले होते. तेव्हापासून ते ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी याआधी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांचा राजीनामा नाकारण्यात आला होता. त्यानंतर खासदार संजय राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घोलप यांनी आपली बाजूही मांडली होती. ठाकरे गटाकडून घोलप यांची कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याने गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील ते उपस्थित राहिले नाही. तसेच ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

शिवसेना उपनेते, मनोहर जोशी मंत्रिमंडळात समाजकल्याण मंत्री आणि पाच वेळा देवळाली मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांचा एकत्रित शिवसेना विस्तारित करण्यात महत्त्वाचा वाटा राहिला आहे. प्रशांत हिरे, उत्तमराव ढिकले, माणिकराव कोकाटे आदी मूळ काँग्रेस संस्कृतीतील बड्या नेत्यांना शिवसेनेत आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. तथापि, गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्हा शिवसेनेतील गट-तटाच्या राजकारणात त्यांचे नेतृत्व दुर्लक्षित झाले. काही महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये त्यांना डावलण्यात आले. याचा परिणाम त्यांनी स्वत:हून पक्षीय बैठकांना येणे टाळण्याचे धोरण स्वीकारले. ही परिस्थिती लक्षात घेता त्यांनी ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटावयास नको, अशी भावना त्यांचे समर्थक व्यक्त करताना दिसत आहेत.