मुंबईकरांसाठी म्हाडाची एक हजार घरांची लॉटरी

मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱयांसाठी खूशखबर आहे. म्हाडातर्फे मुंबईतील घरांसाठी येत्या सहा महिन्यांत लॉटरी काढण्यात येणार आहे. यात पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सुमारे एक हजार घरांचा समावेश असणार आहे.मुंबईत जागेचे भाव वाढल्याने फ्लॅटच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अशा वेळी सर्वसामान्यांना परवडणाऱया किमतीत हक्काचे घर मिळवून देण्याचे काम म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीची अनेकजण चातकाप्रमाणे वाट पाहत असतात.

म्हाडाने कोकण मंडळातील पाच हजारांहून अधिक घरांसाठी २४ फेब्रुवारीला लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी कधी लॉटरी येणार, अशी विचारणा मुंबईकरांकडून केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर जुलैपर्यंत एक हजार घरांची लॉटरी काढण्याचा मानस असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिली. या लॉटरीत सध्या म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या ४०० घरांबरोबरच नव्याने तयार होत असलेल्या सुमारे सहाशेहून अधिक घरांचा समावेश केला जाणार आहे. सध्या लॉटरीपूर्व कामाची तयारी सुरू असून ती पूर्ण होताच लॉटरीचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. राज्याच्या वेगवेगळ्या प्रादेशिक विभागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात घर मिळावे म्हणून म्हाडाची विविध प्रादेशिक मंडळे आहेत.

पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत सुमारे २० एकरहून अधिक जागा मिळविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यापैकी कोल्हापूरचा ताबा लवकरच मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सामान्यांना स्वस्तात घरे मिळवून देण्यासाठी पुण्यात आता सरकारी अथवा म्हाडाच्या मालकीच्या जागा राहिल्या नाहीत. त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील जिल्ह्यातील विविध भागांत रहिवाशी क्षेत्रासाठी जागा आरक्षित आहेत. त्यापैकी काही जागा मिळविण्याचा ‘म्हाडा’चा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत पत्रव्यवहारही सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे सव्वातीन एकर जागा लवकरच ‘म्हाडा’च्या ताब्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा शहराजवळील दरे येथे सुमारे पाच एकर जागा मिळण्यासाठी चाचपणी सुरू आहे.