पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या अध्यक्षपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती राज्य शासनाने केली आहे. त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणार आहे.तीन वेळा खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. मागील वर्षभरात राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे.
राज्य शासनाचे उपसचिव अजित कवडे यांनी याबाबतचे आदेश प्रसृत केले. या पदाचा कार्यभार यापूर्वी कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे आणि एकत्रित राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी सांभाळला आहे. हे पद २०२० पासून रिक्त होते. प्रादेशिक मंडळाचे कामकाजाबाबत धोरण आखणे, आढावा घेणे, नियंत्रण करणे, प्रादेशिक मंडळाच्या दोन प्रकरणासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणे, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामे म्हाडाच्या माध्यमातून त्यांना कामे करता येणार आहे. घाटगे यांनी हे पद एक ते दीड वर्ष सांभाळले होते. त्यांच्यापूर्वीही काही वर्षे हे पद रिक्त होते. पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी हे पद भूषविले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून आढळराव यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. आढळराव यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार आहे.
याबाबत शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गरजू लोकांना घरे देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माझ्यावर म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली आहे. ती मी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. या पदाच्या माध्यमातून मध्यमवर्गीय गरजूंना हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना फायदा करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाली असले तरी शिरूर लोकसभेवरचा क्लेम आपण सोडलेला नाही. महायुतीचा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार मीच असेल आणि मीच निवडून येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणे म्हाडा नंतर मी लोकसभा निवडणूक लढणार नाही हा गैरसमज आहे. असेही आढळराव पाटील म्हणाले.
