कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरीत सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांची मंजूरी देणार असल्याचे सांगत सर्व सांडपाणी शुद्ध होवून पंचगंगा १०० टक्के प्रदुषणमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये कोल्हापूर शहरासाठीच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन प्रकल्पासह शहरातील १०० कोटींचे रस्ते व अन्य विकास कामांचा समावेश आहे. याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उपलब्ध केलेल्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांचे लोकार्पणही यावेळी झाले.या कार्यक्रमास पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, रवीकांत अडसूळ, माजी नगरसेवक राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील देवस्थाने ही आपली बलस्थाने आहेत. पंढरपूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील श्री महालक्ष्मी अंबाबाई व जोतिबा देवस्थानचा आराखडा तिरूपती बालाजी मंदिराच्या धार्तीवर केला जातोय. प्रत्येकजण करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शन घेवूनच कामाला सुरूवात करतो. अशा या कोल्हापूरचा विकास करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. नुकतेच पूरपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 3200 कोटी रूपये जागतिक बँकेकडून मंजूर केले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महापूरावेळी नगर विकास व आरोग्य मंत्री असताना येथे काम करताना मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली, येथील लोक चांगले आहेत. कोल्हापूर महापालिकेच्या विविध प्रश्नांचा व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कायम नियुक्तीचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. येत्या काळात कोल्हापुरातून नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग झाल्यानंतर येथील दळणवळण यंत्रणा सुधारेल. कोल्हापूर हे आता मुंबई पुण्याच्या जवळ येत आहे. ते स्वच्छ, हरित व सुंदर शहर करायचे आहे. देशात पायाभूत सुविधा सर्वात जास्त महाराष्ट्रात उभारल्या जात आहेत.
