नवीमुंबईच्या परिवहन सेवेनंतर आता एसटीच्या शिवनेरीला देखील नुकत्याच सुरु झालेल्या देशातील सर्वात मोठ्या सागरी मार्गावरुन प्रवास करण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे मुंबई ते पुणे धावणारी शिवनेरी आता समुद्राची हवा खात पुण्याला रवाना होणार आहे. या प्रवासाची सुरुवात आज दि.20 फेब्रुवारीपासूनच होणार आहे. या नव्या मार्गामुळे शिवनेरीच्या काही फेऱ्या अटल सागरी सेतूवरुन मुंबईत पोहचतील त्यामुळे प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर पुणे-मंत्रालय बस सकाळी 6:30 आणि स्वारगेट-दादर बस सकाळी 7 वाजता सुटणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 व दुपारी 1 वाजता या बस मंत्रालय व दादर येथून निघतील.त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाचा सुमारे एक तास वाचणार आहे. बस पुणे येथून थेट पनवेल न्हावाशेवा, शिवडीमार्गे मंत्रालय आणि दादर येथे पोहोचतील. यामुळे नागरिकांचा प्रवास वेगाने होणार आहे.
एसटी महामंडळाच्या म्हणण्यानुसार, पुणे बसस्थानक ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर (ई-शिवनेरी) या बस सेवा धावतील. यामुळे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास 25 टक्के वेळ वाचणार आहे. “अटल सेतू आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससाठी महत्त्वाचा दुवा म्हणून काम करेल, जे पुणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरांना मंत्रालय आणि दादर या गजबजलेल्या परिसरांशी जोडेल” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, प्रवासी www.msrtc.gov.in आणि www.npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाइट्सद्वारे तिकीट बूक करू शकतात. याशिवाय, एसटी महामंडळाच्या मोबाईल अॅपवरून देखील तिकीट बूक करता येऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे, तिकीट दरामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. तरी प्रवाशांनी शिवनेरी बस सेवांचा लाभ घ्यावा, असे एसटी महामंडळाकडून आवाहन करण्यात आले आहे.
शिवडी न्हावा-शेवा अटल सेतू सेवेत दाखल झाल्यापासून एसटीची मुंबई-पुणे शिवनेरी बस या मार्गावरुन सुरुवात करा,अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. याचपार्श्वभूमीवर आता मुंबईहून अवघ्या 20 मिनिटांत चिर्ले गाठणे शक्य होणार आहे ते ही विना सिग्नल. चिर्लेहुन हे मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर 60 किमी अंतरावर आहे. वाशी, कळंबोली मार्गाच्या तुलनेत अटल ब्रिजमार्गे पुणे ते दादर हे अंतर पाच किलोमीटरने कमी भरते. याव्यतिरिक्त, वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता, शिवनेरी बसने अटल सेतूला जाण्याचा खर्च कमी केला जाऊ शकतो. मात्र, तुम्ही मुंबईहून अटल ब्रिजमध्ये प्रवेश केल्यास, तुम्हाला मुंबई-पुणे दरम्यानचे पनवेल एसटी स्थानक वगळावे लागेल. पनवेलसह इतर लहान-मोठ्या बसेस तुम्ही नेऊ शकणार नाहीत.
