‘प्रधानमंत्री- सूर्यघर’ मोफत वीज योजनेत तीन किलोवॅट क्षमतेच्या छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला 78 हजार रुपयांपर्यंत सबसिडी (सवलत) मिळणार आहे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातही योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना ‘महावितरण’ला दिल्या आहेत.
1 फेब्रुवारी रोजी निर्मला सीतारमण यांनी अंतरिम बजेटमध्ये सौरऊर्जा योजनेची घोषणा केली होती. पीएम सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यातंर्गत ग्राहक त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे. त्यातून त्यांना वार्षिक 18,000 रुपयांचा फायदा होणार आहे. पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा 22 जानेवारी रोजी केली होती. सरकारने या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेत कसा अर्ज करावा, त्यासाठी काय प्रक्रिया आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. जाणून घ्या, काय आहे ही योजना?
केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर अधिक एक किलोवॅट म्हणजे तीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम बसविणाऱ्या ग्राहकाला एका किलोवॅटला अठरा हजार रुपये अधिकची सबसिडी मिळेल. अर्थात एक किलोवॅटसाठी तीस हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी साठ हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी 78 हजार रुपये अनुदान केंद्र सरकारकडून थेट मिळेल. वीज ग्राहकांनी कितीही क्षमतेची रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविली तरी जास्तीत जास्त एकूण अनुदान प्रती ग्राहक 78 हजार रुपये इतके निश्चित केलेले आहे. दि. 13 फेब्रुवारी 2024 नंतर रूफ टॉप सोलरसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या सर्व ग्राहकांना केंद्र सरकारकडून नव्या दराने अनुदान मिळेल.
राज्यातील वीज ग्राहकांना रूफ टॉप सोलर सिस्टिम बसविण्यासाठी महावितरण मदत करते. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. देशभरात एक कोटी घरांसाठी ही योजना सुरू केलेली असून राज्यातील ग्राहकांनी योजनेचा लवकरात लवकर लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी केले आहे
योजनेसाठी किमान130 ते 1000 चौ. फूट क्षेत्रफळाचे छत आवश्यक आहे. फ्लॅट वा भाडेकरूंना योजनेचा लाभ घेता येत नाही. https://pmsuryaghar. gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून छताच्या क्षेत्रफळानुसार आणि तुमच्या गरजेनुसार तितक्या क्षमतेचे सोलर पॅनल बसविता येते. त्यासाठी सरकारकडून अनुदानही मिळते.
मोफत वीज योजनेसाठी कसा करावा अर्ज?
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट https://pmsuryaghar.gov.in वर जाऊन अप्लाय फॉर रूफटॉप सोलर निवडा.
आता आपले राज्य व वीज वितरण कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर आपला वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
त्यानंतर ओपन झालेल्या नव्या पेजवर कंज्यूमर नंबर आणि मोबाइल नंबर टाकून लॉगइन करा.
त्यानंतर फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून रूफटॉप सोलर पॅनलसाठी अर्ज करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला फीजिबिलिटी अप्रूव्हल मिळेल. त्यानंतर आपल्या DISCOM सोबत रजिस्टर्ड कोणत्याही वेंडरकडून सोलर प्लाँट इंस्टॉल करू शकाल.
सोलर पॅनल इंस्टॉलेशन झाल्यानंतर पुढच्या स्टेपनुसार तुम्हाला प्लाँट डिटेलसोबत नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.
