माझ्यावर टीका करण्याऐवजी निर्णयातील चुका दाखवा – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

मी घेतलेले निर्णय हे कायदेशीर असून माझ्यावर टीका करण्यापेक्षा निर्णयातील चुका दाखवा असे विधान करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टीका करणाऱ्यांवर पलटवार केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकर यांना सातत्याने लक्ष केले जात आहे. राहुल नार्वेकर हे नवीन घटनाकर आहेत अशी टीका काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, एखाद्या संस्थेने आपल्या विरोधात निर्णय दिला तर त्यावर टीका करायची, अशी त्यांची कायमची भूमिका आहे. संस्थेने बाजूने निर्णय दिला तर सत्याचा विजय झाल्याचे सांगत आनंद साजरा करतात. ते सातत्याने आपल्या निर्णयावर टीका करत आहेत. परंतु मी घेतलेला निर्णय कायदेशीर आहे. विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा माझा निर्णय चुकीचा कसा हे दाखवा, असे आव्हान नार्वेकर यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष तुमच्याविरोधात न्यायालयात गेली आहेत? या प्रश्नावर राहुल नार्वेकर म्हणाले, न्यायालयात जाणे हे प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. न्यायालयात गेल्याने माझा निर्णय चुकीता आहे असे होत नाही. मी दिलेला निर्णय हा कायदेशीर असून माझ्यासमोर आलेल्या पुराव्याच्या आधारे दिला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने दुसऱ्या पक्ष (ठाकरे गट) अपेक्षित निर्णय दिला नाही. तेव्हा निवडणूक आयोगावर टीका केली होती. न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांवर चुकीचे आरोप केले गेले. एखाद्या संस्तेने आपल्या विरोधात निर्णय दिला. त्यावर संस्थेला ते टार्गेट करायचे ही त्यांची भूमिका आहे. जर संस्थेने बाजून निर्णय दिला तर, सत्याचा विजय झाल्याचे सांगत आनंद साजरा करायचा आणि ते सातत्याने आपल्या निर्णयावर टीका करत आहे. पण मी घेतलेला निर्णयहा कायदेशीर आहे.

निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हेतुपरस्सर असे आरोप केले जातात. या प्रकरणाशी संबंध नसलेल्या गोष्टी वारंवार बोलल्या जात होत्या. माझा निर्णय चुकीचा असेल किंवा मी कोणाच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेतला असेल तर त्यांनी माझ्या निर्णयात काय चुक आहे हे दाखवून द्यावे,असे आव्हान राहुल नार्वेकर यांनी केले. माझा निर्णय हा कायदेशीर दृष्टीने योग्य आहे. याची त्यांनाही कल्पना आहे. मी दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच आहे. म्हणूनच माझ्या निकालातील चुक न दाखवता केवळ बिनबुडाचे आरोप करणे, हे त्यांच्या सोईचे आहे,असा आरोप राहुल नार्वेकर यांनी केला.