पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. त्यानुसार येत्या 28 फेब्रुवारी रोजी या योजनेच्या 16 व्या हप्त्यांची रक्कम देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. पीएम किसानचा नवा हप्ता तुम्हाला मिळणार का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव 2024 च्या नवीन यादीत पाहावं लागेल. त्यासाठी कुठंही जाण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवरून घरी बसूनच तुम्ही ते तपासू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 यावर्षीपासून देशभरातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक मदत म्हणून वार्षिक सहा हजार रुपये देणारी योजना म्हणजेच पीएम किसान योजनेची घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून आजवर देशभरातून 12 कोटी शेतकरी लाभ घेत आहेत. या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये वर्षातून तीन हप्त्यांद्वारे दिले जातात. सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट जमा केली जाते या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा व इतर खर्च करण्यासाठी रकमेची मदत होते आणि आजवर 15 हप्ते शेतकऱ्यांना जमा करण्यात आले आहे.
ऑक्टोबर 2022 मध्ये या योजनेतंर्गत 12 वा हप्ता जमा करण्यात आला होता. फेब्रुवारी 2023 मध्ये 13 वा हप्ता जमा करण्यात आला. 27 जुलै रोजी 14 हप्ता जमा झाला. नोव्हेंबर महिन्यात केंद्राने 15 वा हप्ता जमा केला होता. साधारणतः पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झाली आहे. आता 16 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांप्रमाणे एकूण 6 हजार रुपये देण्यात येतात.
यापूर्वी राबविण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1 लाख 4 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच 3 लाख 1 हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.
