मराठा समाजाबाबत मी काय केलंय हे महाराष्ट्राला पूर्णपणे माहिती आहे; मला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार प्रतिसाद उमटले. या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागे कोण आहे? त्याची सर्व सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी एक, एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या आहेत. चौकशीतून सर्व समोर येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले,या विषयावर माझी बोलायची इच्छा नव्हती. पण तरी विषय निघालाच आहे तर काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं मला वाटतं. या सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाबाबत मी काय केलंय हे पूर्णपणे माहिती आहे. मी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते उच्च न्यायालयात टिकवलं. जोपर्यंत मुख्यमंत्री होतो, सर्वोच्च न्यायालयातही टिकवलं. सारथीसारखी संस्था सुरू करणं, विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देणं अशा योजना आपण सरकारच्या वतीने सुरू केल्या. त्यामुळे मराठा समाजाच्या संदर्भात मला कुणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मागे कोण आहे. त्यांनी कोणासोबत बैठका घेतल्या. जरांगेंना घरात येऊन भेटणार नेते कोण आहेत. त्यांना पैसे कोण पुरवते. हे हळुहळू समोर येतं आहे, असंही फडणवीस म्हणालेत.मला जरांगे पाटील यांच्यासोबत काही देणं घेणं नाही, त्यांनी जी स्क्रीप्ट वाचली, ती रोज काहीजण बोलतात. तीच आज जरांगेंनी वाचली. आमच्याकडे सर्व माहिती आहे. सगळी चौकशी करून हे षंडयत्र बाहेर काढली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की, जर आयमाय काढणार असेल तर योग्य नाही. तुमच्या बदल जर कोणी बोलले तर, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस राहतील. जरांगे पाटील यांच्या संदर्भात मला घेणं देणं नाही, मात्र त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे शोधलं जाईल. औरंगाबाद या ठिकाणी वॉर रुम कोणी सुरु केली, याची सखोल चौकशी होईल, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.