अंतरवली सराटीत झालेल्या दगडफेकीचे आज विधानसभेत जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावरही सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील हे कट कारस्थानाची भाषा बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तर अंतरवली सराटी प्रकरणी एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामागे राष्ट्रवादी असेल तर या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनीही याप्रकरणी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जरांगेंच्या आंदोलनावर बोलताना अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं, आमचा असा आरोप आहे. पिस्तुल कोणाकडे सापडली, लोकप्रतिनीधींची घर जाळली, याची चौकशी नको का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत एसआयटी लावा, अशी मागणीही केली आहे. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनीही केली आहे.
देवेंद्र फडणवीसांना, भुजबळांना अशा धमक्या कोण देतंय असंही ते म्हटले. दरम्यान, दुसरीकडं विधानपरिषदेत प्रवीण दरेकर हे देखील जरांगेंच्या विधानांवरुन आक्रमक झाले. त्यांनी देखील त्यांच्या विधानांमागं कोण आहे? याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली. तसेच धमक्या देणाऱ्या जरांगेंना अटक करण्याची मागणी केली.
त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा अथवा हिंसक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याचं गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं.
