गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर एटीएस, नार्कोट्रिक कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे कारवाई करत आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. समुद्रात फिरणाऱ्या संशयास्पद बोटीतून कोट्यावधी रुपयांचं अंमलीपदार्थ जप्त करण्यात आलं आहे. तब्बल ३३०० किलो वजनी ड्रग्जचा साठा पकडण्यात आला असून ५ विदेशी तस्करांना अटक करण्यात आलीय. भारतीय उपखंडातील अंमली पदार्थांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती आहे.
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये ३०८९ किलो चरस, १६० किलो मेथॅम्फेटामाइन आणि २५ किलो मॉर्फिनचा समावेश आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल २००० कोटी रुपये असल्याचं समजतंय. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.धक्कादायक बाब म्हणजे ड्रग्जच्या पॅकेटवर पाकिस्तानचं नाव आढळून आलंय. नौदल, एनसीबी आणि एटीएसने केलेल्या या संयुक्त कारवाईत ५ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
भारतीय नौदलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपासून गुजरात येथील समुद्राच्या सीमेवर एक अज्ञात बोट उभी होती. ही बोट भारताच्या हद्दीत घुसल्यावर तिला थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी बोटीत ३३०० कोटींचे ड्रग्ज आढळून आले.नौदलाने कारवाई करत बोटीतील ५ क्रू मेंबर्सना ताब्यात घेतले. पकडलेल्या बोटीतील ताब्यात घेतलेले ५ आरोपी पाकिस्तानी असल्याचा संशय आहे. सध्या त्यांची कसून चौकशी केली जात असून आरोपींना गुजरातमधील पोरबंदर येथे नेण्यात आले आहे.
