उठता बसता राजकारणातील सुसंस्कृततेवर बोलायचे. यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृतत राजकारणाचे दाखले द्यायचे आणि विरोधकांना चिमटे घेणारे शरद पवार. पण उपमुख्यमंत्री पदासारख्या संविधानिक पदावरील नेत्याला आईमाई वरून शिव्या देणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासारख्या माणसाची बाजू घेतो. तेव्हा आता कोठे गेला गोविंदसुता तुमचा सुसंस्कृतपणा हे विचारल्याशिवाय महाराष्ट्राची जनता राहणार नाही, असे आता लोक म्हणू लागले आहेत.
मनोज जरांगे यांची उर्मट वक्तव्ये, त्यांच्या आंदोलनाला असलेली विशिष्ट पक्षाची फूस संपूर्ण महाराष्ट्राने पहिली. विधिमंडळात यावर चर्चा झाली. स्पेशल इन्वेस्टीगेशन टीमच्या “स्कॅनर”खालीही आली आहे. तरीही शरद पवार यांचे राजकारण हे की ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असभ्यतेचा आरोप करत मनोज जरांगे यांची बाजू अप्रत्यक्षपणे उचलून धरत आहेत.
मनोज जरांगे तोल सुटल्यासारखे बोलायला लागल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची आई माई काढली. राजमाता जिजाऊंची आन, महाराष्ट्र विसरणारा नाही माऊलीचा अपमान असे म्हणत तमाम महाराष्ट्रातील जनता देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलू लागली.सर्वपक्षीय आमदारांनी फडणवीस यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मनोज जरांगे आणखी भडकले. फडणवीसांवर तसाच हल्लाबोल करण्याच्या प्रयत्नात आपल्या तोंडून चुकून आईमाई गेली असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो, असे ते बोलून गेले पण आमच्या आई मायावर फडणवीसांनी गोळ्या घातल्या लाथा मारल्या असे बेछूट आरोप केले.
त्यांच्या पाठोपाठ शरद पवारांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच असभ्यतेचा आरोप केला यासाठी त्यांनी स्वतःच्या 50 वर्षांच्या राजकारणाचा नेहमीचा हवाला दिला. शरद पवारांची या सगळ्यांवर मखलाशी तरी पाहा. ते म्हणाले खरं सांगायचे तर जबाबदार लोकांचे वक्तव्य जबाबदार असलं पाहिजे. जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे महाराष्ट्रात कधीही पाहिले नाही. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक लोकांचे वक्तव्ये पाहिली.
एखादा माणूस तुमची आईमाई काढतो आणि तुम्ही फक्त त्याचा प्रतिवाद करू लागला की असभ्य वक्तव्य. वा रे पवारसाहेब तुमची सुसंस्कृतता, असे आता लोक बोलू लागले आहेत.
जरांगे यांचा माझ्यासोबत संबंध बोलायचे तर त्यांचे उपोषण सुरु झाल्यानंतर मी पहिल्यांदा गेलो होतो. मी त्यांना भेटून एवढेच सांगितले होते की, तुमच्या मागण्या संदर्भातील आग्रह समजू शकतो. पण दोन समाजात अंतर वाढेल असे काही करु नका. महाराष्ट्राचे सामाजिक ऐक्य टिकेल, असे करा. तुमच्या समाजासाठी आग्रही समजू शकतो. पण इतर समाजासाठी हे योग्य दिसणार नाही. एवढाच त्यांचा आणि माझा संवाद झाला.
आता याची क्रोनोलॉजी पाहा. पवार म्हणतात दोन समाजात अंतर वाढेल असे काही करु नका, असे मी त्यांना सांगितले. पण या भेटीनंतरच जरांगे आणखी आक्रमक होऊन छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलू लागले. लोकप्रतिनिधीनाव शिवीगाळ करू लागले.
मनोज जरांगे यांनी आरोप केल्यानंतर आता त्यांच्या आंदोलन प्रकरणात एसआयटी चौकशी लावली जाईल. यातून कोणत्या पक्षाचा यात हात आहे ते तपासले जाईल, असे उपमुख्यमंत्री – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सांगितले. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिले. “एसआयटी चौकशी आवश्य करा. एसआयटी करा. वाटेल ती चौकशी लावा, आमची काही हरकत नाही. कर नाही त्याला डर कसला. संबंधच नाही. ते म्हणतात फोन आले. मी मनोज जरांगेंना एक फोन जरी केल्याचे सिद्ध केले तर मी वाटेल ते मान्य करेन, असे शरद पवार म्हणाले.
आता अशा गोष्टी, अशी कारस्थाने, असे षडयंत्र फोनवर होते असे मानायला महाराष्ट्राची जनता दूधखुळी आहे का?
जरांगे प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल, त्यातून सत्यही यथावकाश बाहेर येईल. पण अनेकांच्या तथाकथित सुसंस्कृततेचे बुरखे मात्र यातून फाडले गेले आहेत हे निश्चित.
