पंतप्रधान नरेंद्र मोदी यवतमाळमधून आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार ६ हजार रुपये

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार, असे एकूण प्रति शेतकरी सहा हजार रुपये आज, बुधवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. राज्यातील ८७.९६ लाख शेतकरी पात्र असून, दोन्ही योजनेचे सुमारे १९४३.४६ कोटी रुपये बँक खात्यात जमा होणार आहेत. खरीप, रब्बी हंगामात पेरणी, मशागत, खते आणि शेतमजुरांना मजुरी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचा निधी ऐन उन्हाळ्यात मिळत आहे.

पंतप्रधान मोदी आज बुधवारी (ता.२८) महिला बचत गटांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून अडीच लाख महिलांची उपस्थिती राहणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी राज्यातून सतराशे बसगाड्या बोलविण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर, अकोला, वाशीम, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वर्धा, नांदेड, नगर आदी अनेक आगारांतील बसगाड्या दाखल झाल्या आहेत.

राज्यात पीएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्य शासनाने पीएम किसान योजनेच्या १४व्या हप्याचा लाभ अदा झालेल्या राज्यातील ८५.६० लाख शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता रक्कम एक हजार ७१२ कोटी यापूर्वी अदा केलेला आहे. उर्वरीत दुसरा तिसरा हप्ता एकत्रितरित्या २८ फेब्रुवारीला यवतमाळ येथे पंतप्रधानांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

राज्याच्या योजनेमधून जवळपास ३,८०० कोटी थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. पीएम किसान योजनेचे दोन हजार तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता मिळून ४ हजार असा ६ हजार रुपयांचा लाभ यवतमाळ येथून राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.