निवडणूक आयोगाने शिंदे गट हीच खरी शिवसेना घोषित केले असताना उद्धव ठाकरे यांच्या गटाने पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढल्याची तक्रार शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी केली आहे. परिणामी शिंदे गटाने ठाकरे गटाच्या विरोधातात केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. याचदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेनेदेखील आयकर विभागाला पत्र लिहून उद्धव ठाकरे गटाचा कर कोण भरत आहे? याची माहिती मागवली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
शिवसेना पक्षाचे निधी संबंधीचे हे खाते कोण चालवते? आणि ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले, त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली असून बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यापासून शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या पक्षाचा कर कोण भरत आहे, याची माहिती घेण्यासाठीआर्थिक गुन्हे शाखेकडून आयकर विभागाला पत्र पाठवले आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे उल्लंघन करून शिवसेनेच्या माजी नेत्यांनी पक्षाचे नेते म्हणून खोटी ओळख दिली, असा आरोप शिंदे गटानं केला आहे. हे नेते जाणूनबुजून करचोरी, बनावटगिरी आणि फसवणुकीच्या कृत्यांमध्ये गुंतले असल्याचा दावा त्यांनी पुरावा म्हणून वेब पोर्टलवरून स्क्रीन ग्रॅब सादर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास सुरू केला आहे. पक्षाच्या खात्यांमधून पैसे काढल्याबद्दल माहिती मागवली आहे. बँक अधिकाऱ्यांकडून बँकेत झालेल्या व्यवहारांचा तपशील मागितला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या कर पेमेंट्सच्या तपशीलासाठी आयकर विभागाला पत्र आर्थिक गुन्हे शाखेनं लिहिले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढून घेतल्याची तक्रार शिंदे गटाने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेत केली होती. शिंदे गटाने पक्षाच्या तपशीलांचा गैरवापर करत फसवणूक करत असल्याचा दावा तक्रारीत केला होता. त्यानंतर ठाकरे गटाच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती.
निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाचे असल्याचा निकाल दिला होता. त्यामुळे निधी नेमका कधी काढला गेला आणि तो कुणी काढला, याची चौकशी करण्यात येत असून, यावरून ऐन निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी पाहायला मिळणार आहेत.
